श्रीक्षेत्र जेजुरीचा कुलस्वामी खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, रंकापासून रावांपर्यंत सर्वांच्या देवघरामध्ये पूजिला जाणारा कुलस्वामी खंडेरायाच्या जेजुरनगरीचे ऐतिहासिक महत्वही अपरंपार आहे. जेजुरीगडावर मिळणारा सर्वात जुना शिलालेख तेराव्या शतकातील आहे तर चैतन्य महाप्रभूंनी १५११ मध्ये जेजुरीला भेट दिल्याचे उल्लेख असलेले ऐतिहासिक दस्त उपलब्ध आहेत. असे अनेक शिलालेख आणि ऐतिहासिक दस्त यांमध्ये जेजुरीचा उल्लेख आढळत असला तरी विसाव्या शतकातील छायाचित्राव्यातिरिक्त जेजुरी संदर्भात चित्र उपलब्ध होत नव्हते. परंतु नुकतेच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये रेखाटलेले जेजुरगडाचे चित्र लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीच्या संग्रहामध्ये उपलब्ध असल्याची माहिती प्रथमच उजेडात आली आहे. तर दुसरे चित्र १८६२ मधील असल्याची माहिती www.jejuri.in संकेतस्थळावर प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यापैकी पहिले चित्र आहे ते १८४४ मध्ये इंग्रज चित्रकार अलेक्झांडर नाश (Nash, Alexander) यांनी जेजुरगडाचे विहंगम दृश्य वायव्येकडील होळकर तलावाच्या कडेला बसून रेखाटलेले आहे. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव बांधला, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत. या तलावच्या पश्चिमेकडील बाजूने पेन्सिलने रेखाटले हे चित्र आहे.
अलेक्सांदर नाश(Nash, Alexander) हे भारतात आले त्यावेळी बॉम्बे इंजिनिअर्स मध्ये सेवा करीत होते तर १८३६ पासून महसूल खात्यातील दख्खन सर्वेक्षण(Revenue Survey of the Deccan) विभागामध्ये सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) पदावर कार्यरत होते. त्यानंतर १८४१मध्ये त्यांना बढती मिळाली आणि १८४६ पर्यंत अधीक्षक (Superintendent) या पदावर कार्यरत होते. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी काही पेन्सिल रेखाटणे केली त्यामध्ये विजापूर शहरातील १६, पुरंदर किल्ल्यावरील दोन आणि जेजुरगडाचे एक अशी एकोणीस चित्रांचा संग्रह लंडन येथील ब्रिटीश लायब्ररी मध्ये आहे.
सन १८४४-४५ मध्ये जेजुरीतील चित्र रेखाटताना त्यांनी होळकर तलावाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीगडाचे चित्र रेखाटलेले आहे. हे चित्र कदाचित उन्हाळ्यामध्ये रेखाटलेले असावे असे वाटते कारण पावसाळ्यामध्ये होळकर तलाव पाण्याने भरलेला असतो परंतु सदर चित्रामध्ये अर्धा तलाव कोरडा दिसत आहे. होळकर तलावाशेजारी सुभेदार मल्हारराव होळकरांची छत्री असलेले मल्हार गौतमेश्वर मंदिर आहे त्याचे आणि होळकर वाड्याचे रेखाटन केले आहे. जेजुरगडाचे आणि छत्री मंदिराचे प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये उमटलेली दाखविण्याची किमया चित्रकाराने केली आहे. तलावाच्या बाजूला अजूनही अस्तित्वात असलेली चिंचेची बाग या चित्रामध्ये दिसत आहे. जेजुरगडावरील उत्तर दिशेचे महाद्वार आणि पायरी मार्गावरील कमानी तसेच गडावरील मंदिराचे दोन कळस हे चित्र जेजुरीचेच आहे याबद्दल शंका येण्याचे कारण नाही.
या चित्राचे नामकरण करताना चित्रकाराची शब्दोच्चारामध्ये किंवा भाषेतील अंतरामुळे गफलत झालेली दिसते, जेजुरीला 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' किंवा 'देवाची जेजुरी' असे संबोधले जाते त्याचे एकत्रीकरण करून कदाचित Dejouri (डेजोरी, दिजोरी) असे लिह्ल्यामुळे हे चित्र नक्की कोणत्या स्थानाचे आहे यामध्ये अभ्यासक साशंक होते त्यांनी de आणि ri या अक्षरांवरून हे चित्र देवगिरीचे ( दौलताबाद ) असल्याचे नोंदविले आहे, परंतु किल्ले देवगिरी आणि या चित्रामध्ये कुठल्याही प्रकारचे साधर्म्य नसल्याचे आम्ही www.jejuri.in या संकेतस्थळावर दाखविले. डेक्कन (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश) या प्रांतामध्ये डेजोरी किंवा दिजोरी असे कोणतेही स्थान नसल्याचे आमचे ठाम मत आहे. या संदर्भामध्ये ब्रिटीश लायब्ररी कडे संपर्क साधून चित्रातील दृश्याचे विस्तृत विश्लेषण सदर केले आहे.
दुसरे चित्र श्रीमती सारा जेन लायार्द यांनी सन १८६२ मध्ये जेजुरी गावाच्या आग्नेयेकडे आणि जेजुरगडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेशवे तलावावरून जेजुरगडाचे दिसणारे दृश्य जलरंगामध्ये (water colour) काढलेले आहे. चित्राचे नामकरण 'The Hindoo Temple of Jejurie - 1862' असे केले आहे.